Home क्राईम लग्नाच्या दहा दिवस आधीच काळाचा घाला! दहिगावातील तरुणाचा ट्रॅक्टरखाली चिरडून दुर्दैवी अंत

लग्नाच्या दहा दिवस आधीच काळाचा घाला! दहिगावातील तरुणाचा ट्रॅक्टरखाली चिरडून दुर्दैवी अंत


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे रोटावेटरचे काम करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार, २३ मे रोजी दुपारी घडली. योगेश यशवंत पाटील असे मृत तरुणाचे नाव असून अवघ्या दहा दिवसांवर त्याचा विवाह ठरलेला होता. लग्नाआधीच काळाने झडप घातल्याने संपूर्ण दहिगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील रहिवासी योगेश यशवंत पाटील हा बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होता. दुपारच्या सुमारास काम सुरू असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडला. त्यानंतर तो रोटावेटरमध्ये अडकल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला.

घटना घडली तेव्हा ट्रॅक्टर सुरू अवस्थेतच पुढे जाऊन शेजारील शेतात पोहोचले. शेताजवळ निंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका तरुणाने हा प्रकार पाहताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर बंद केले. त्यानंतर त्याने त्वरित योगेशच्या वडिलांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

गंभीर अवस्थेत योगेशला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी राजेंद्र यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत योगेश पाटील याचा विवाह येत्या १८ जून रोजी पार पडणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. शेतीकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्दैवी घटना घडू शकतात, अशी चर्चा परिसरात होत आहे.


Protected Content

Play sound