Home Cities जळगाव नशिराबादकरांना गॅस रिफीलसाठी शहरी निकष लागू करा; उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांची मागणी

नशिराबादकरांना गॅस रिफीलसाठी शहरी निकष लागू करा; उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद नगरपरिषद स्थापन होऊन सहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना शहरातील नागरिकांना अद्याप ग्रामीण भागाप्रमाणेच गॅस रिफील बुकिंगची मर्यादा लागू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून नशिराबादला शहरी निकष लागू करत गॅस रिफील बुकिंगसाठी २५ दिवसांची मर्यादा लागू करण्याची मागणी केली आहे.

नशिराबाद हे आता ग्रामीण भागातून शहरी भागात समाविष्ट झाले असून शहरातील नागरिकांना शहरी सुविधांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारत सरकारच्या गॅस वितरण व्यवस्थेनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस सिलेंडर रिफील बुकिंगसाठी ४५ दिवसांचा कालावधी लागू आहे, तर शहरी भागातील नागरिकांना २५ दिवसांनंतर रिफील बुकिंगची सुविधा उपलब्ध होते. मात्र नशिराबाद शहरातील गॅस ग्राहकांना अजूनही ४५ दिवसांचीच अट लागू असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः उन्हाळा आणि टंचाईच्या काळात घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यास महिलांसह सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे हाल होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नशिराबाद शहरातील गॅस ग्राहकांना शहरी भागाप्रमाणे २५ दिवसांमध्ये रिफील बुकिंगची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम तसेच इतर गॅस वितरण कंपन्यांना नशिराबाद शहराची स्वतंत्र शहरी नोंद घेण्याचे निर्देश द्यावेत आणि नागरिकांना शहरी निकषांनुसार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी केली आहे.

या निवेदनावर भूषण भानुदा, संदीप विष्णू पाटील, रविंद्र संतोष चौधरी, विकृत्ती वासुदेव गायकवाड, राहुल कोशलोधरी आणि वैभव संजय गोसावी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या मागणीमुळे प्रशासन आता कोणता निर्णय घेते याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.

नशिराबाद नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना शहरी सुविधांचा लाभ मिळावा आणि गॅस रिफीलसाठी होणारी प्रतीक्षा कमी व्हावी, यासाठी करण्यात आलेली ही मागणी नागरिकांसाठी दिलासादायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound