
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण संवेदनशील बनत असताना, एकता संघटन जळगावने प्रशासन आणि काही माध्यमांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “संवेदनशील ठिकाणे”, “विशेष बंदोबस्त”, “नाके बंदी” आणि “कठोर कारवाई” अशा शब्दांत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे मुस्लिम समाजामध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर एकता संघटनचे नेते फारूक शेख यांनी मुस्लिम समाजाला कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करत बकरी ईदच्या दिवशी गोवंशाची कुर्बानी न करण्याचे स्पष्टपणे सांगितले.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत फारूक शेख यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा लागू असून मुस्लिम समाजाने नेहमीच या कायद्याचा आदर केला आहे आणि पुढेही करेल. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कुणीही गाय अथवा गोवंशाची कुर्बानी करण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून बकरी आणि म्हैस यांचीच कुर्बानी करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी मुस्लिम बांधवांना केले.
यावेळी फारूक शेख यांनी केंद्र सरकारकडे गायीला “राष्ट्रीय पशू” घोषित करण्याची मागणीही केली. देशात गायीबाबत मोठ्या प्रमाणात संवेदनशीलता असल्यास केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेत अधिकृत निर्णय करावा, जेणेकरून दरवर्षी समाजात निर्माण होणारा तणाव टाळता येईल, असे त्यांनी म्हटले. धार्मिक परंपरा आणि कायद्याचे पालन यामध्ये समतोल राखण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, शतकानुशतके सुरू असलेली बकरी ईदची कुर्बानीची परंपरा पूर्णपणे बंद करता येणार नाही, असे न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्येक वर्षी मुस्लिम समाजाला संशयाच्या नजरेतून पाहणे आणि भीतीच्या वातावरणात ढकलणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
फारूक शेख यांनी शांतता समितीच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या काही मुस्लिम नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. प्रशासनासमोर समाजाच्या धार्मिक आणि संवैधानिक अधिकारांबाबत ठाम भूमिका मांडली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ बैठकीत उपस्थित राहून शांत बसण्यात समाजाचे हित नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, एकता संघटनतर्फे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने अधिकृत आणि विश्वासदायक निवेदन जारी करून मुस्लिम समाजात निर्माण झालेली भीती दूर करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी Archana Mali यांना मौलाना हाफिज रहीम पटेल यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी फारूक शेख, आरिफ देशमुख, मौलाना गुफरान, अनवर सिकलगर, मतीन पटेल, जकी पटेल, मजहर खान, नजमुद्दीन शेख, अँड. अवेश शेख, युसूफ शाह, अल्ताफ शेख, जोहेद शेख, मुजाहिद खान, ताहेर शेख आणि रऊफ टेलर आदी उपस्थित होते.
याचवेळी एकता संघटनने NEET परीक्षा घोटाळ्याबाबतही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर केले. NEET प्रकरणातील आरोपी, कोचिंग क्लास चालक, एजंट आणि संबंधितांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, बँक व्यवहार आणि संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून संबंधितांना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणीही संघटनेने केली आहे. हे निवेदन मतीन पटेल यांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले.



