
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या जूनियर १९ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड प्रक्रिया आता सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे सोमवार, २५ मे रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याने जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय ही स्पर्धा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ४ ते ६ जून २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील १९ वर्षांखालील मुले आणि मुलींचा संघ निवडण्यासाठी भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवार दुपारी ४ वाजता निवड चाचणी होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील होतकरू क्रिकेटपटूंना या निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार असून, गुणवत्ताधारित खेळाडूंची अंतिम निवड केली जाणार आहे.
निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख ३० जून २००७ नंतरची असणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. पात्र खेळाडूंनी चाचणीसाठी उपस्थित राहताना स्वतःचे आधार कार्ड, जन्म दाखल्याची छायांकित प्रत तसेच क्रिकेटचा परिपूर्ण गणवेश सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेत शिस्त, खेळातील कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्तीला विशेष महत्त्व दिले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव वासेफ पटेल यांनी अधिकाधिक खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील युवा क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर चमक दाखवण्याची ही महत्त्वाची संधी असून, निवड झालेल्या खेळाडूंना जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.



