Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये मोकाट डुकरांचा हैदोस; महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी

अमळनेरमध्ये मोकाट डुकरांचा हैदोस; महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून ऐंशी फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेवर डुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील मुंदडा नगर ते आर. के. नगर परिसरातील ऐंशी फुटी रस्ता हा नागरिकांच्या फिरण्यासाठी प्रमुख ठिकाण मानला जातो. दररोज रात्री आठ ते दहा वाजेदरम्यान येथे महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास महावीर नगर परिसरातील योगिता सहदेव पाटील या आपल्या मुलीसोबत फिरत असताना अचानक मागून आलेल्या डुकराने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात डुकराने त्यांच्या गुडघ्याच्या मागील बाजूस चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. हल्ला इतका अचानक आणि भयावह होता की काही क्षण परिसरात घबराट पसरली. यावेळी सोबत असलेल्या मुलीने प्रसंगावधान राखत डुकराचा प्रतिकार केला आणि आरडाओरड करून मदतीसाठी नागरिकांना बोलावले. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर ऐंशी फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरात मोकाट डुकरे, कुत्रे आणि इतर जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रशासनाकडून त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.

विशेष म्हणजे, ऐंशी फुटी रस्त्यावर अवघ्या एका आठवड्यात घडलेली ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांत मोकाट जनावरांचा त्रास वाढत असून शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना रोजच धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेने तात्काळ कारवाई करून मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या संदर्भात अमळनेर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मोकाट कुत्र्यांवरही लवकरच बंदोबस्त करण्यात येणार असून प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शालेय परिसरातील मोकाट जनावरांची माहिती मिळाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. तसेच डुक्कर पालन करणाऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या असून आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound