Home क्राईम रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीचा सुळसुळाट ; नागरिक त्रस्त

रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीचा सुळसुळाट ; नागरिक त्रस्त


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीने पुन्हा डोके वर काढले असून दिवसा मातीची आणि रात्री मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. तालुक्यातील विविध भागांमध्ये विना परवाना उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाढत्या अवैध वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

रावेर शहरासह खिरवड, अटवाडे, के-हाळा, धामोडी, ऐनपूर आणि कांडवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही भागांत दिवसाढवळ्या मातीचे उत्खनन करून ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात आहे. तर रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर धावत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवैध वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होत आहे. जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यांवर खड्डे पडत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि ग्रामस्थांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महसूल विभागाकडून वेळोवेळी कारवाई होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अवैध वाहतूक थांबत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या मते, काही दिवस कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारे वाहतूक सुरू होत असल्याने संबंधित यंत्रणांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तहसीलदार दिपा जेधे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून विशेष पथकाद्वारे मोहीम राबवावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound