जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, रेड स्वस्तिक सोसायटी या राष्ट्रीय संस्थेचे महासचिव तसेच हिंदू रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक शेषराव शिंदे यांना पुणे येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात “शंभू शौर्य पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात हा सन्मान सोहळा पार पडला. विविध सामाजिक, सेवाभावी आणि जनहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन शंभू राज्याभिषेक ट्रस्ट पुणे, वुई आर टुगेदर सेवाभावी संस्था पुणे आणि महाराष्ट्र विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. हजारो शंभूभक्त आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

अशोक शिंदे यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. माता भगिनींवरील अन्याय आणि अवमान करणाऱ्यांविरोधात त्यांनी अनेक वेळा आक्रमक भूमिका घेत आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची राज्यभरात दखल घेतली जात आहे.
हजारो बेरोजगारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच देशभरातील दीड कोटींहून अधिक गरजूंना मानवतावादी भूमिकेतून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विशेष मोहिमा, हृदयरोग, मेंदू, मनका विकार आणि कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया, मोफत डायलेसिस सेंटर तसेच कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा प्रकल्प उभारण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत यंदाचा “शंभू शौर्य पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार कवी रामदास फुटाणे, प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, ज्योतीताई मेटे, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव, अभिनेत्री सौ. तरडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, चांगुलपणाच्या चळवळीचे प्रमुख राज देशमुख, शेखर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानानंतर महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक डॉ. टी. एस. भाल, माजी मंत्री सुरेशदादा जैन, शिवाजी राजे जाधव, विजयसिंह राजे भोसले, कैलास जाधव, सुनील पवार, सुरेश कोते, अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे, मोहन वर्दे, प्रकाश दादा पाटील, राष्ट्रपती पदक विजेते दिलीप गवळी, अॅड. झाल्टे, ज्येष्ठ पत्रकार शेखरदादा पाटील, डॉ. धनंजय बेंद्रे , प्रकाश आडेलकर, भास्करराव काळे, ज्ञानदीप पाटील, डॉ. गणेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अशोक शिंदे यांचे अभिनंदन केले.
सामाजिक बांधिलकी, सेवाभावी उपक्रम आणि जनतेसाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे अशोक शेळके शिंदे यांना मिळालेला “शंभू शौर्य पुरस्कार” हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जात असून, या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



