Home Uncategorized भोंदू बाबांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचे कायदेशीर सहकार्य मिळावे; अंनिस’ व ‘मविप’ची मागणी

भोंदू बाबांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचे कायदेशीर सहकार्य मिळावे; अंनिस’ व ‘मविप’ची मागणी


जळगाव. लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करणे, नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आणि तथाकथित चमत्कारांमागील विज्ञान उघडकीस आणण्यासाठी आता जळगाव पोलीस दलाच्या अधिकृत सहकार्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) व मराठी विज्ञान परिषद, जळगाव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावच्या पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील एक लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अंनिस’ आणि ‘मविप’ या दोन्ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये सामाजिक जनजागृतीचे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे काम करत आहेत. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी या संस्थांकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात.

या निवेदनात कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, अनेकदा मैदानी पातळीवर काम करताना किंवा एखाद्या भागात सक्रिय असलेल्या ‘भोंदू बाबा’ व ‘बुवा’ यांच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश (स्टिंग ऑपरेशन) करताना कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. तसेच समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या, चुकीच्या रूढी-परंपरा आणि अनिष्ट प्रथांना जाहीर विरोध करताना स्थानिक पातळीवर विरोधाचा आणि रोषाचा सामना करावा लागतो.
अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि समाजकंटकांवर जरब बसावी, यासाठी पोलिसांचे कायदेशीर सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे सामाजिक कार्य अधिक सुरक्षित आणि प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाने जळगाव जिल्हाभरात कार्यकर्त्यांना योग्य ते कायदेशीर सहकार्य व संरक्षण पुरवावे, अशी आग्रही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञान परिषदेचे जळगाव येथील प्रमुख कार्यकर्ते मिथुन ढिवरे आणि दिलीप भारंबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound