जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्तव्यावर असताना अपघाती निधन झालेल्या आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबाप्रती पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली संवेदनशीलता दाखवली आहे. यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार भरत विठ्ठल कोळी यांचे ९ एप्रिल २०२६ रोजी एका दुर्दैवी अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनाने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी माणुसकीचे एक उत्तम उदाहरण सादर केले आहे.
दिवंगत भरत कोळी यांची लहान मुलगी अन्वी भरत कोळी हिने नुकतीच इयत्ता दुसरीची परीक्षा उत्तीर्ण केली असून ती आता तिसरीत गेली आहे. पित्याचे छत्र हरवल्यानंतरही तिने मिळवलेल्या या यशाची दखल पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी घेतली. त्यांनी चिमुरड्या अन्वीला विशेषत्वाने पोलीस मुख्यालयात बोलावून घेतले.

या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी अत्यंत आपुलकीने अन्वीची विचारपूस केली आणि तिचे मनापासून कौतुक केले. भविष्यात तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला. या कौतुकाची थाप म्हणून त्यांनी अन्वीला नवीन शैक्षणिक वर्षासाठी लागणारे शालेय साहित्य आणि काही वस्तू भेट म्हणून दिल्या. पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे कोळी कुटुंबाचे डोळे पाणावले. खाकी वर्दीतील या संवेदनशील आणि आश्वासक रुपामुळे जळगाव पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



