Home प्रशासन तहसील ऑनलाइन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांची तहसील कार्यालयावर रॅली

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांची तहसील कार्यालयावर रॅली


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऑनलाइन औषध विक्री बंद करावी तसेच औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने 20 मे रोजी देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत धरणगाव तालुका औषधी विक्रेता संघटनेनेही आज शहरासह तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसभर औषध विक्री सेवा ठप्प राहणार असून नागरिकांना आवश्यक औषधांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

जळगाव जिल्हा औषध विक्रेता असोसिएशनच्या माध्यमातून हा बंद आयोजित करण्यात आला असून धरणगाव तालुक्यातील सर्व रिटेल केमिस्ट दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून अनेक नियमांचे उल्लंघन करून औषधे विकली जात आहेत. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशीही धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

दरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी इमर्जन्सी औषध सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तालुका अध्यक्ष सुधाकर वाणी (9421514932) तसेच सचिव छोटूभाऊ जाधव (7798111180) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज सर्व केमिस्ट बांधव एकत्र येऊन शहरातून रॅली काढणार असून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ भंगाळे, तालुका अध्यक्ष सुधाकर वाणी आणि सचिव छोटूभाऊ जाधव यांनी या बंदला सर्व औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound