Home प्रशासन भुसावळात औषध दुकाने कडकडीत बंद ; ई-फार्मसीच्या विरोधात केमिस्टआक्रमक!

भुसावळात औषध दुकाने कडकडीत बंद ; ई-फार्मसीच्या विरोधात केमिस्टआक्रमक!


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ई-फार्मसीचे बेकायदेशीर संचालन, मोठ्या कंपन्यांचे शोषणात्मक किंमत धोरण आणि ऑनलाईन औषध विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्याला निर्माण झालेला धोका, या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी एक दिवसीय बंदला भुसावळ शहर आणि तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. विविध मागण्यांसाठी आज शहरातील सर्व औषधी दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आले.

गेल्या काही काळापासून देशात ऑनलाईन औषध विक्रीचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढले आहे. या ई-फार्मसीच्या माध्यमातून कोणतीही कडक तपासणी न करता, बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप स्थानिक केमिस्ट संघटनेने केला आहे. यामुळे अँटीबायोटिक्सचा गैरवापर प्रचंड वाढला असून रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, औषधे ही बाजारात मिळणाऱ्या इतर सामान्य वस्तूंसारखी नसून, त्यांच्या विक्रीसाठी कठोर कायदेशीर नियंत्रण आणि तज्ज्ञ फार्मसिस्टची थेट देखरेख असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, कॉर्पोरेट कंपन्या नफा कमावण्यासाठी नियमांना हरताळ फासत आहेत. तसेच काही जाचक सरकारी अधिसूचना मागे घेण्यात याव्यात, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे.

आज दिवसभर औषध दुकाने बंद राहिल्याने रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली, तरी हा लढा जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठीच असल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने यावर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भुसावळ केमिस्ट संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound