Home Cities जळगाव बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने !

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशात वाढणारी महागाई, बेरोजगारी आणि वीज ग्राहकांवर लादले जाणारे स्मार्ट मीटर याविरोधात ‘बहुजन मुक्ती पार्टी’तर्फे देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील काशिनाथ देवरे यांच्या नेतृत्वात जी.एस.मैदानात चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. “स्मार्ट मीटरच्या नावाखाली खाजगी कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन प्रमाणेच गैरकायदेशीरपणे ग्राहकांची लूट करत आहेत. यामुळे वीज बिले भरमसाट वाढली असून सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे,” असा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचे दर १५०० ते २००० रुपयांपर्यंत, तर व्यावसायिक गॅसचे दर २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

प्रमुख मागण्या:
१. स्मार्ट मीटर त्वरित बंद करून त्याऐवजी पारदर्शक मीटर बसवण्यात यावेत. २. घरगुती गॅस सिलेंडर ४०० रुपयांत आणि व्यावसायिक सिलेंडर ७०० रुपयांत उपलब्ध करून द्यावा. ३. पेट्रोलचे दर ९० रुपये आणि डिझेलचे दर ८० रुपये प्रति लीटर करावेत. ४. वीज बिल न भरल्यास थेट वीज कपात करणाऱ्या खाजगी कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी.

तीन टप्प्यांत देशव्यापी आंदोलन:
बहुजन मुक्ती पार्टी देशातील ६२५ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करत असून, त्याचा पहिला टप्पा १२ मे रोजी ‘लालटेन भेट’ आंदोलनाने पार पडला. आज, २० मे रोजी दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चूल पेटवा’ आंदोलन करून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला, तर आगामी ३१ मे रोजी ‘दे धक्का’ आंदोलन करून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध केला जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील देहडे यांनी दिला आहे


Protected Content

Play sound