Home आरोग्य ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेते आक्रमक ; जळगावात तीव्र निदर्शने

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेते आक्रमक ; जळगावात तीव्र निदर्शने


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन औषध विक्रीचे वाढते जाळे आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलतींमुळे किरकोळ औषध व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. या वाढत्या धोक्यापासून किरकोळ औषध व्यवसाय वाचवण्यासाठी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे. या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत ‘जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन’ने या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

भव्य रॅली आणि घोषणाबाजी :
या आंदोलनाचा भाग म्हणून जळगाव शहरातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या नेतृत्वात शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथून औषध विक्रेत्यांची एक भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि चुकीच्या व्यावसायिक पद्धतींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून जात थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.

जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन :
जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली पोहोचल्यानंतर, जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या विविध न्याय्य मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ कायदेशीर नियंत्रण आणण्यात यावे, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

व्यवसाय आणि आरोग्याचा धोका
असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, ऑनलाईन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे प्रामाणिकपणे कर भरणारा स्थानिक किरकोळ औषध विक्रेता देशोधडीला लागला आहे. तसेच, ऑनलाईन माध्यमांतून होणाऱ्या बनावट औषध विक्रीमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकारने यावर कडक पावले न उचलल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही औषध विक्रेत्यांनी दिला आहे. या बंदमुळे आज नागरिकांना औषधांसाठी काही प्रमाणात धावपळ करावी लागली.


Protected Content

Play sound