मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक निर्माण झालेल्या इंधनटंचाईमुळे वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना इंधनासाठी एका पेट्रोल पंपावरून दुसऱ्या पंपावर हेलपाटे मारावे लागत आहेत. परिणामी शहरातील तसेच ग्रामीण भागातील दैनंदिन जनजीवनावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
तालुक्यातील काही मोजक्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहनांच्या मोठ्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी सकाळपासून अनेक तास रांगेत उभे राहूनही इंधन न मिळाल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही” तसेच काही ठिकाणी “पेट्रोल व डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम वाढला असून नेमके कोणत्या पंपावर इंधन उपलब्ध आहे, याबाबत माहिती मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे व्यापारी, प्रवासी, शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.
विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. शेतीची विविध कामे, पाणीपुरवठा तसेच मालवाहतुकीसाठी डिझेलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे व्यापारी वर्गालाही माल वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याने आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी प्रशासन आणि तेल वितरण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. इंधन पुरवठा नियमित करून कृत्रिम तुटवडा असल्यास त्याची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नसले तरी लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



