विद्यापीठाकडून विद्यार्थी परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

GNAGNAGNA

 

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर केला असून दि.७ सप्टेंबर, २०१९ रोजी तिघंही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालये/ परिसंस्था/विद्यापीठ शैक्षणिक विभागासाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे.

 

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सत्यजित साळवे यांनी बुधवारी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या विद्यार्थी परिषद निवडणूकी करीता सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्याचा पुर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश अनिवार्य असून २० ऑगस्ट, २०१९ पर्यंत विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाला प्रवेश झालेला असावा.विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे २३ ऑगस्ट रोजी महाविद्यालय/परिसंस्था / शैक्षणिक विभाग यांच्याकडून निवडणूकीची अधिसूचना व विहित नमुने प्रसिद्ध केले जातील.

 

२४ ऑगस्टला मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी विद्यापीठाच्या अधिसभागृहात दुपारी २:३० वाजता आरक्षण सोडत होईल. त्याच दिवशी सांयकाळी ५ वाजेनंतर तुकडीनिहाय तात्पूरती मतदार यादी संबंधित महाविद्यालयांमध्ये संकेतस्थळ व सूचना फलकावर मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ ऑगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंत मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदविता येतील.२७ ऑगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमधील सक्षम प्राधिकरणाने अक्षेपाबाबत निर्णय देऊन निवडणूक अधिकारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करतील. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ५ या कालावधीत संबंधित महाविद्यालयांमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल केले जातील.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्राप्त नामनिर्देशन अर्जाची छाननी होईल व सांयकाळी ५ वाजता वैध व अवैध अर्जाची यादी प्रसिद्ध होईल.

 

३ सप्टेंबरला सकाळी ११ ते ५ या वेळेत अर्ज वैधतेबाबत आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील,४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता या आक्षेपांची सुनावणी घेऊन निर्णय दिला जाईल व सांयकाळी ५ वाजता अंतिम नामनिर्देशन अर्जाची यादी प्रसिद्ध होईल.५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देश अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. याच दिवशी सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ७ सप्टेंबरला मतदान होणार असून प्राचार्यांनी महाविद्यालयांचे वेळापत्रक लक्षात घेऊन सलग चार तास मतदानासाठी ठरवायाचे आहेत. त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. निकाल घोषित झाल्यानंतर निवडून आलेल्या अध्यक्ष/सचिव/महिला प्रतिनिधी/मागासवर्गीय प्रतिनिधी आणि एनएसएस/क्रीडा/एनसीसी/सांस्कृतिक उपक्रम या मधील प्राचार्यानी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे.

 

९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशेब विहित नमुन्यात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा, विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे-९ सप्टेंबर रोजी निवडणूकीची अधिसूचना सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल. सांयकाळी ४ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची तात्पूरती मतदार यादी प्रसिद्ध होईल. ११ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मतदार यादीवर आक्षेप प्राचार्याकडे नोंदवता येतील. त्याच दिवशी चार वाजता प्राचार्यांनी आलेले लेखी आक्षेप विद्यापीठ निवडणूक कक्षाकडे ई-मेलद्वारे पाठवावेत. १२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आक्षेपांवर सक्षम प्राधिकरण निर्णय देतील. सायंकाळी ५ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. १३ व १४ सप्टेंबर सकाळी ११ ते ४:३० या वेळेत विद्यापीठ प्रशासकीय इमारतीत नामनिर्देश अर्ज दाखल करता येतील.

१५ सप्टेंबरला अर्जाची छाननी होईल व सांयकाळी ५ वाजता विद्यापीठ संकेतस्थळ व सूचना फलकावर वैध,अवैध अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर १६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजे पर्यंत आक्षेप नोंदविता येतील. प्राप्त आक्षेपांवर १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता निर्णय दिला जाईल व सांयकाळी ५ वाजता वैध, अवैध अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. १८ व १९ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरला सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. २३ सप्टेंबरला महाविद्यालय/परिसंस्था/विद्यापीठ शैक्षणिक विभाग येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होईल व निकाल जाहिर केला जाईल. २८ सप्टेंबरला एनएसएस/क्रीडा/एनससीसी/सांस्कृतिक उपक्रम यातून सदस्यांचे नामनिर्देशन होणार आहे. २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशोब सकाळी ११ ते दुपारी ४:३० या वेळत सादर करणे आवश्यक आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्या पासून ते विद्यार्थी परिषद निवडणूक निकाल घोषित होई पर्यंत आचारसंहितेचा कालावधी राहणार आहे.

Protected Content