यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सौखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दहिगाव व परिसरात १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डेंग्यू प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गावात विशेष मोहिम राबविण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दहिगाव, मोहराळा आणि सौखेडा सिम परिसरात फिरून नागरिकांना डेंग्यू हिवतापाबाबत माहिती दिली. घरांच्या परिसरातील पाणी साठे तपासणे, स्वच्छता राखणे तसेच पाण्याची भांडी झाकून ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “स्वच्छ करा आणि झाकून ठेवा, डेंग्यूला हरवण्याचे उपाय करा” असा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
तसेच डेंग्यू नियंत्रणासाठी जैविक उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी मासे डबक्यांमध्ये सोडण्यात आले. नागरिकांना हस्तपत्रिकांचे वितरण करून डेंग्यू प्रतिबंधक उपाय समजावून सांगण्यात आले. या मोहिमेत आरोग्य सेवक मो. हनीफ तडवी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.



