धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका संशयिताला गावठी बनावटीच्या पिस्टलसह अटक केली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रे आणि घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील पवार यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दिनांक गुरुवार १४ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे पथकासह दोनगाव शिवारातील गिरणा नदीपात्रात अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी त्यांना नदीपात्रात एक इसम संशयास्पद रितीने फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीची मॅगझीनसह एक गावठी बनावटीची पिस्टल मिळून आली.

या प्रकरणी पोलिसांनी आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. आव्हाणे ता. जळगाव) याला ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून पिस्टल जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरक्षक दत्तात्रय बडगुजर, पो. कॉ. ज्ञानेश्वर बाविस्कर,रवींद्र चौधरी, विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे.



