यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले राहुल पंढरीनाथ बारी यांची शिवसेना (शिंदे गट) युवा सेना रावेर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे यावलसह संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा वारसा जपत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना कार्याध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार एसआयआर प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे, मतदान यादीचे नियोजन, तसेच युवासेना सदस्य नोंदणी अभियान अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी विधानसभा स्तरावर संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुख म्हणून राहुल पंढरीनाथ बारी यांची निवड करण्यात आल्याचे अधिकृत नियुक्तीपत्र आज पक्षातर्फे त्यांना प्राप्त झाले. या नियुक्तीमुळे रावेर विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे राहुल बारी यांनी मागील महिन्यात भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या या राजकीय निर्णयानंतर अल्पावधीतच पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत महत्त्वाची जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राहुल बारी हे सामाजिक आणि युवकांशी निगडित विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्काचा लाभ युवा सेनेला निश्चितच होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही नियुक्ती निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीनंतर राहुल बारी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. रावेर विधानसभा क्षेत्रात युवा सेनेचे संघटन अधिक सक्षम करून पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल बारी यांच्या नियुक्तीमुळे यावल आणि रावेर विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाच्या संघटनात्मक बांधणीला वेग मिळणार असून युवा कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



