Home Cities यावल हतनूर धरणातून पाणी सोडल्याने शहराचा पाणीप्रश्न मार्गी – नगराध्यक्ष छायाताई पाटील  

हतनूर धरणातून पाणी सोडल्याने शहराचा पाणीप्रश्न मार्गी – नगराध्यक्ष छायाताई पाटील  


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून नगरपालिकेचा पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. हतनूर धरणाच्या पाटचारीतून यावल नगरपालिकेच्या साठवण तलावात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आल्याने पावसाळ्यापर्यंत शहराला पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून शहरात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावल शहराला हतनूर धरणाच्या पाटचारीतून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी प्रथम नगरपालिकेच्या साठवण तलावात जमा केले जाते आणि त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिन्यांद्वारे पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून साठवण तलावातील जलसाठा कमी झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यातच वाढत्या उन्हामुळे विद्युत वितरण कंपनीकडून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा अधिक विस्कळीत झाला होता.

या पार्श्वभूमीवर शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिकेकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या. नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून यावल नगरपालिकेसाठी आरक्षित असलेले हक्काचे आवर्तन तातडीने मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागाकडून 11 मे रोजी पाणी सोडण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार आज प्रत्यक्ष साठवण तलावात पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली.

पाणी साठवण तलावात पाणी पोहोचत असल्याची खात्री करण्यासाठी नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कार्यालयीन अधीक्षक कोल्हे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक पराग सराफ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व्यवस्थेची माहिती देत शहरातील पाणीसाठा आता समाधानकारक झाल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांनी नागरिकांना दिलासा देताना पावसाळ्यापर्यंत शहरातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी अफवा किंवा पाण्याच्या प्रश्नावरून होणाऱ्या राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासन आणि नगरपालिकेच्या समन्वयातून शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.


Previous articleनीट-यूजी 2026 परीक्षा रद्दप्रकरणी अभाविप आक्रमक
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound