Home क्राईम NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून 30 वर्षीय युवक अटकेत

NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून 30 वर्षीय युवक अटकेत


नाशिक-वृत्तसेवा । देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप, चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात आता केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने तपासाची सूत्रे हाती घेतली असून नाशिकमधून एका 30 वर्षीय युवकाला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.

नाशिक गुन्हे शाखेने राजस्थान सीबीआयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. अटक करण्यात आलेला संशयित युवक मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून त्याने BAMS पर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित युवकाची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेत अखेर त्याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपली हेअरस्टाईल बदलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गुप्त पद्धतीने तपास करत संशयिताचा माग काढला. दुपारी सुमारे बारा वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. केंद्रीय तपास पथकाकडे त्याला सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणात नाशिक ते राजस्थान आणि हरियाणा असा मोठा नेटवर्क असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर तिची पहिली कॉपी नाशिकमध्ये आढळली. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचवण्यात आली आणि तेथे तिचे तब्बल 10 सेट तयार करण्यात आले. पुढे हे सेट बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे NEET परीक्षा प्रक्रियेशी संबंधित संस्था आणि एजन्सींच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला असून तपास यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंतच्या तपासात जयपूरमध्ये अटक करण्यात आलेला मनीष नावाचा आरोपी या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेपूर्वीच संभाव्य प्रश्नपत्रिका मिळवून त्याने संपूर्ण कट रचल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

राजस्थानमधील SOG च्या ताब्यात सध्या 13 संशयित आरोपी असून त्यांची चौकशी आता सीबीआयकडून केली जाणार आहे. 3 मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यानच प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय अधिक गडद झाला असून त्यामुळे केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीवरही दबाव वाढला आहे. परीक्षा रद्द झाल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले असून नव्या परीक्षेच्या तारखेची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.


Protected Content

Play sound