Home क्रीडा सागर पार्कच्या मैदानात ‘राजकीय क्रिकेट’ रंगले

सागर पार्कच्या मैदानात ‘राजकीय क्रिकेट’ रंगले


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या सागर पार्क मैदानावर आयोजित होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांबाबत नव्या वादाला तोंड फुटले असून आगामी महासभेत या मैदानावर स्पर्धांना परवानगी देण्याचा ठराव रद्द करण्याचा विषय चर्चेस येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत मैदानावरील स्पर्धा बंद करण्याचा कोणताही निर्णय खेळाडूंवर अन्याय करणारा ठरेल, असा इशारा दिला आहे.

शहरातील क्रिकेट आणि इतर खेळाडूंसाठी सागर पार्क हे महत्त्वाचे क्रीडांगण मानले जाते. अनेक वर्षांपासून येथे विविध क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जात असून हजारो युवक या मैदानाशी जोडले गेले आहेत. मात्र आता या मैदानावर स्पर्धांना बंदी घालण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार असल्याने क्रीडा क्षेत्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे आरोप केला की, सागर पार्क मैदानावरील क्रिकेट स्पर्धा बंद करण्यामागे वेगळेच राजकारण सुरू आहे. हे मैदान भविष्यात बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. खेळाडूंसाठी उपलब्ध असलेली मोजकी मैदाने टिकवून ठेवणे ही मनपाची जबाबदारी असून, महासभेत हा ठराव नामंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या संपूर्ण वादावर महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्टीकरण देत मैदानावरील सर्व क्रीडा स्पर्धा बंद करण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले. मैदानाशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी विशेषतः दहावी आणि बारावी परीक्षांच्या काळात होणाऱ्या आवाजाच्या त्रासाबाबत तक्रारी केल्याने नगरसेवक नितीन बरडे यांनी महासभेत प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.

महापौरांनी स्पष्ट केले की, परीक्षा काळात मोठ्या आवाजातील डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे डीजेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा विचार करण्यात येत आहे. स्पर्धेदरम्यान डीजे आढळल्यास संबंधित टीमवर कारवाई करून त्यांची स्पर्धा रद्द करण्यात येईल. तसेच ध्वनिप्रदूषणाबाबत काही नियमावली महासभेत निश्चित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र क्रिकेट सामने पूर्णपणे बंद केले जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमहापौर मनोज चौधरी यांनीही खेळाडूंच्या बाजूने भूमिका घेत शहरात क्रिकेटसाठी पर्यायी मैदानांची कमतरता असल्याचे सांगितले. त्यामुळे सागर पार्क मैदान खेळासाठी कायम ठेवले जावे, हीच आमची भूमिका राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महासभेत चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल, मात्र शिवसेना शिंदे गट खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सागर पार्क मैदानावरील स्पर्धांमधून महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ४६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे स्पर्धा बंद झाल्यास आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल, असे उपमहापौरांनी नमूद केले. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मनपासाठी हे नुकसान परवडणारे नसल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound