Home Cities जळगाव राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये जळगाव पोलिसांची चमकदार कामगिरी; तीन सुवर्णपदकांसह उत्कृष्ट टीमचा...

राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये जळगाव पोलिसांची चमकदार कामगिरी; तीन सुवर्णपदकांसह उत्कृष्ट टीमचा मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पोलिस दलासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ (TOT) प्रशिक्षण स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलिस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत तीन सुवर्णपदके आणि दोन कास्यपदके पटकावली आहेत. उत्कृष्ट शस्त्र हाताळणी, प्रशिक्षण कौशल्य आणि सामूहिक कामगिरीच्या जोरावर जळगाव पोलिसांनी राज्यभरात आपली वेगळी छाप उमटवत ‘उत्कृष्ट टीम’चा बहुमानही मिळवला आहे.

सोमवार, ११ मे रोजी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात पदक विजेत्या अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, पोलिस उपअधीक्षक प्रदीप वाघूर आणि राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुरवाडे यांच्या उपस्थितीत विजेत्या टीमला प्रमाणपत्रे आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या संकल्पनेतून राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांसाठी ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ हा विशेष प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता. वाढते दहशतवाद, नक्षलवाद, गंभीर गुन्हे आणि शस्त्रसंबंधित घटनांचा प्रभावी सामना करण्यासाठी पोलिस दल अधिक सक्षम आणि प्रशिक्षित व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१, पुणे येथे ४ मे ते ९ मे २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला होता. जळगाव जिल्हा पोलिस दलाकडून राखीव पोलिस उपनिरीक्षक सचिन विचवे, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फरअली सय्यद, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पाटील, पोलिस हवालदार रज्जाक सय्यद, संतोष सुरवाडे, महिला पोलिस हवालदार मेघना जोशी, पोलिस नाईक किरण सपकाळे, संदीप पाटील, पोलिस अंमलदार समीर पठाण आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियंका टेकरे यांनी सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणादरम्यान शस्त्र हाताळणी, अंतर्गत वर्ग फायरिंग, शिकवणी आणि तांत्रिक कौशल्यांवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. राखीव पोलिस उपनिरीक्षक सचिन विचवे यांनी ‘शिकवणी’ प्रकारात ८३ गुण मिळवत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फरअली सय्यद यांनी त्याच प्रकारात ७७ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत कास्यपदक मिळवले.

पोलिस अंमलदार समीर पठाण यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत ‘अंतर्गत वर्ग फायरिंग’ प्रकारात ८७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. याशिवाय त्यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून आणखी एक सुवर्णपदक मिळवले. एकूण ४०० पैकी ३३७ गुण मिळवत त्यांनी विशेष प्रशंसा मिळवली. त्यांच्या या कामगिरीमुळे जळगाव पोलिस दलाची राज्यस्तरावर प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.

जळगाव पोलिस दलाने सामूहिक कामगिरीतही प्रथम क्रमांक मिळवत ‘उत्कृष्ट टीम’चा किताब पटकावला. या यशामुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलाचा आत्मविश्वास वाढला असून, आधुनिक आणि सक्षम पोलिस यंत्रणा उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


Protected Content

Play sound