Home क्राईम आयपीएलवरील सट्ट्यावर एलसीबीचा छापा : साडेदहा लाखांचा ऐवज जप्त

आयपीएलवरील सट्ट्यावर एलसीबीचा छापा : साडेदहा लाखांचा ऐवज जप्त


जामनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल 10 लाख 53 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हिवरखेडा रोडवरील एका घरात काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.

या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला. यात रोख रक्कम : 9 लाख 2 हजार 300 रुपये; मोबाईल फोन : 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे; टीव्ही व साउंडबार : 25 हजार रुपये किमतीचे आणि ४१ एटीएम कार्ड यांचा समावेश होता. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 10 लाख 53 हजार 800 रुपये इतकी असून तो पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, या कारवाईत एलसीबीच्या पथकाने देवानंद सुभाष सोनवणे, रा. जामनेर; रितेश अशोक नेरकर, रा. जामनेर; परीक्षित रविंद्र पाटील, रा. जामनेर आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे, रा. जामनेर या चौघांचा समावेश आहे. या कारवाईनंतर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 236/26 अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 व 5 अंतर्गत चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएल हंगामादरम्यान क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सट्टेबाजी होत असल्याचे अनेकदा समोर येते. अशा प्रकारच्या अवैध कारवायांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. जामनेरमधील ही कारवाई सट्टेबाजांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.


Protected Content

Play sound