जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा येथे ७ मे रोजी हिलाल माधव पाटील यांच्या खळ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. खळ्यात जनावरे बांधलेली असल्याने ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले. मात्र या दुर्घटनेत एक गाय सुमारे ६० ते ७० टक्के भाजली.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय चिकित्सालय सोनवद येथील पशुधन पर्यवेक्षक नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित गायीवर प्राथमिक उपचार केले. पशुपालकांनी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९६२ वर संपर्क साधून मदत मागितली.

जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध विकास डॉ. प्रदीप झोड यांनी या घटनेची दखल घेत धरणगाव येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अशोक महाजन यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार धरणगाव फिरते पशुवैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पथक प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉ. गुंजरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षक भूषण पाटील, परिचर सनी पाटील व श्री. गोतरने यांनी सलग दोन दिवस घटनास्थळी भेट देत बाधित गायीसह इतर जनावरांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले.
उपचारानंतर संबंधित गाय चारा व पाणी व्यवस्थित घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गायीचे प्राण वाचल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे.



