यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गावातील विहिरीजवळ खेळत असताना पाय घसरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी ६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. न्याजोद्दीन तडवी असे मृत मुलाचे नाव असून, तो आपल्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे तडवी कुटुंबावर आभाळ फाटले असून संपूर्ण चुंचाळे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्याजोद्दीन हा बुधवारी सायंकाळी गावातील विहिरीजवळ खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल विहिरीत कोसळला. मुलगा विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्याला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र विहीर खोल असल्याने अडचणी येत होत्या. अखेर रात्रीच्या सुमारास शोधमोहीम राबवण्यासाठी डांभुर्णी येथील निष्णात पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

डांभुर्णी येथील बचाव पथकाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम घेऊन न्याजोद्दीनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन पूर्ण केल्यानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या स्वाधीन केला. आपल्या एकुलत्या एक मुलाचा असा अचानक आणि भीषण अंत झाल्याने पालकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या दुर्दैवी घटनेप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.



