सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच ज्योती संतोष कोळी यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी पुन्हा एकदा अपात्र घोषित केल्याची महत्त्वाची घटना समोर आली आहे. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोचुर खुर्द येथील सरपंच ज्योती कोळी यांनी अनुसूचित जमाती (एसटी) राखीव जागेवरून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. नियमानुसार त्यांना निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, त्यांनी निर्धारित कालावधीत हे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांना यापूर्वीही अपात्र करण्यात आले होते.

दरम्यान, राज्य शासनाने अपात्र ठरलेल्या सरपंचांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदतवाढ त्या प्रकरणांसाठी लागू होती, ज्यांचे जात वैधता प्रस्ताव पडताळणी समितीकडे आवश्यक पुराव्यांसह प्रलंबित होते. शासनाच्या या निर्णयानंतर ज्योती कोळी यांना पुन्हा सरपंच पद बहाल करण्यात आले होते.
मात्र, तपासाअंती असे समोर आले की, ज्योती कोळी यांनी धुळे येथील जात वैधता पडताळणी समितीकडे आपला प्रस्तावच सादर केलेला नव्हता. याबाबत समितीने तक्रारदार व ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई घनश्याम तायडे यांना लेखी माहिती दिली होती.
या पार्श्वभूमीवर, “सरपंच पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही” असा मुद्दा उपस्थित करत लिलाबाई तायडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी जळगाव यांनी सुनावणी घेतली आणि सर्व बाबींचा विचार करून ज्योती कोळी यांना दुसऱ्यांदा अपात्र घोषित केले. या प्रकरणात तक्रारदारांच्या वतीने अॅडव्होकेट विश्वासराव भोसले यांनी कायदेशीर कामकाज पाहिले.



