Home Cities जळगाव अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी !

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी !


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये प्रवेश योजनेसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी २ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे. सन २००९-१० पासून सुरू असलेल्या या योजनेद्वारे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षणाची संधी दिली जाते.

या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीतील असणे आवश्यक असून संबंधित जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असावे व त्यासाठी सन २०२५-२६ चा तहसीलदारांचा दाखला आवश्यक राहील. तसेच पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत, ही अटही लागू आहे.

इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३१ डिसेंबर २०२६ रोजी किमान ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा जन्म जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान झालेला असावा. अर्जासोबत जन्मदाखला, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांनी संबंधित यादीतील अनुक्रमांक नमूद करावा. अनाथ, दिव्यांग किंवा विशेष परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले सादर करणे आवश्यक राहील.

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून उपलब्ध जागांनुसार विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. केवळ अर्ज केल्याने प्रवेशाची हमी मिळणार नाही, तसेच निवड झाल्यानंतर शाळा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

अर्ज ११ मे २०२६ पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आवार, चोपडा रोड, यावल येथे उपलब्ध आहेत. अर्ज कार्यालयीन वेळेतच स्वीकारले जातील. अंतिम मुदतीनंतर आलेले अथवा अपूर्ण अर्ज नामंजूर करण्यात येतील.

इच्छुक पालकांनी अर्ज मिळविताना विद्यार्थ्याचा जन्मदाखला व आधार कार्ड सोबत आणून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound