जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील सीए शाखेमध्ये “इन्कम टॅक्स 2025 मधील नवीन टीडीएस तरतुदी” या विषयावर जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. करप्रणालीतील नव्या बदलांची माहिती देत व्यावसायिकांना अद्ययावत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला सीए सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगाव शहराचे आयकर अधिकारी कुणाल रमेश वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मनू भारद्वाज आणि सीए दर्शन जैन यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सीए शाखेचे अध्यक्ष रोशन रुणवाल, सहकारी सदस्य तृप्ती राठी तसेच मोठ्या संख्येने सीए सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष रोशन रुणवाल यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी ‘इन्कम टॅक्स 2025’ अंतर्गत लागू होणाऱ्या नवीन टीडीएस तरतुदींचे महत्त्व अधोरेखित करत, या बदलांमुळे करप्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार असल्याचे नमूद केले. तसेच सभासदांनी अद्ययावत ज्ञान आत्मसात करून व्यावसायिक कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर तज्ज्ञ वक्ते मनू भारद्वाज यांनी आपल्या सत्रात नवीन टीडीएस तरतुदींचे सखोल व व्यावहारिक मार्गदर्शन केले. त्यांनी विविध कलमांतील बदल, टीडीएस कपात, दर, देय तारखा आणि अनुपालनातील महत्त्वाच्या बाबींचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. व्यवसाय आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची उदाहरणांसह मांडणी करत त्यांनी त्यावरील उपायही सुचवले. चुकीच्या अनुपालनामुळे होणारे दंड आणि व्याज टाळण्यासाठी योग्य टीडीएस व्यवस्थापन कसे करावे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर सीए दर्शन जैन यांनीही ‘इन्कम टॅक्स 2025’ अंतर्गत नवीन टीडीएस तरतुदींवर सखोल विवेचन केले. त्यांनी व्यावहारिक अडचणी आणि त्यावरील उपाय उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच अचूक अनुपालनासाठी आवश्यक प्रक्रिया, नोंदी आणि नियोजन यावर त्यांनी भर दिला. सत्रादरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने उत्तरे देत शंकानिरसन केले.
या कार्यक्रमामुळे सहभागी सीए सदस्यांना नवीन कर तरतुदींबाबत सखोल आणि अद्ययावत माहिती मिळाली असून, त्यांच्या व्यावसायिक कार्यात याचा मोठा उपयोग होणार आहे.



