
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कानळदा रोडवरील नवीन हायवे पुलाखालील पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री एका तरुणावर आणि त्याच्या मित्रांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी अपघाताबाबत विचारपूस केल्याचा राग मनात धरून संशयित आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रतिलाल संतोष सोनवणे (वय ३२, रा. हरिओम नगर) हे त्यांचे मित्र मयुर लहासे यांच्यासोबत झालेली दुचाकी अपघाताची घटना आणि त्यामागचे कारण विचारण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी फैजल शेख सलीम, अफान शेख अफसर आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, संशयित आरोपी फैजल याने हातातील लोखंडी रॉडने रतिलाल यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात रतिलाल गंभीर जखमी झाले आहेत. इतक्यावरच न थांबता, आरोपी अफान याने स्टीलच्या पट्टीने फिर्यादीचे मित्र हर्षल कोळी व आनंद विसपुते यांच्या हातापायावर मारून त्यांनाही जखमी केले. सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत फैजल शेख सलीम आणि अफान शेख अफसर या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गुलाब नामदेव माळी करत आहेत.



