
भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका १६ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पीडित मुलगी ही शहरात एका इंग्लिश स्पीकिंग क्लासला जात होती. त्याच क्लासमध्ये येणारा संशयित आरोपी तिच्याकडे वाकड्या नजरेने बघत असे. त्याच्या या त्रासामुळे पीडितेने तो क्लास जाणे बंद केले होते. मात्र, त्यानंतरही संशयिताचा त्रास थांबला नाही. पीडिता शाळेत जात असताना किंवा तिच्या भावाला शाळेत सोडायला जात असताना संशयित तिचा पाठलाग करत असे. इतकेच नाही तर, पीडितेच्या आईच्या मोबाईलमधील स्नॅपचॅटवर मेसेज करून त्याने पीडितेला वारंवार मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पीडितेच्या नातेवाईकांनी अखेर पोलीस स्टेशन गाठले. दिपाली वनराज पाटील (वय ३३) यांच्या फिर्यादीवरून विधीसंघर्षीत १६ वर्षीय बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार या करत आहेत.



