Home करियर धरणगावच्या सागर पाटील व किशोर पाटील यांची PSI पदावर निवड 

धरणगावच्या सागर पाटील व किशोर पाटील यांची PSI पदावर निवड 


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली असून बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर झेंडा रोवला आहे. सागर पाटील (लोणे) आणि किशोर पाटील (बांभोरी) या दोघांच्या निवडीमुळे शाळा आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या शाळांनी विद्यार्थ्यांना दिलेले संस्कार, गुणवत्ता आणि शिस्त यामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. त्याच परंपरेला पुढे नेत सागर आणि किशोर यांनी कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली, ज्यामुळे त्यांच्या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

शालेय जीवनापासूनच दोघेही विद्यार्थी हुशार, नम्र आणि आज्ञाधारक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या गुणांमुळे आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे त्यांनी आज हे मोठे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण धरणगाव तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, सचिव ललितजी उपासनी, उपाध्यक्ष चिंतामण पाटील तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यासोबतच मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, एस. एस. पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही दोघांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.

सागर पाटील आणि किशोर पाटील यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound