Home क्राईम अखेर जळगाव महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ॲटलांटा कंपनीविरूध्द गुन्हा दाखल

अखेर जळगाव महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ॲटलांटा कंपनीविरूध्द गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ॲटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी ( इंडिया ) या कंपनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, ॲटलांटा गैरव्यवहार प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असले तरी यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. अलीकडेच या कंपनीने महापालिकेवर दावा करून अकरा कोटी रूपयांची भरपाई न्यायालयाच्या माध्यमातून मागितली. यावर नगरसेवक अरविंद देशमुख, ॲड. दिलीप पोकळे आणि ॲड. शुचिता हाडा यांनी अनुक्रमे सर्वोच्च व उच्च न्यायालयात त्रयस्थ अर्जदार म्हणून दाद मागितली. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत ॲटलांटा कंपनीला अकरा कोटी रूपये देण्याचा निकाल दिला, आणि यानुसार महापालिकेने ही रक्कम अदा केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकात ॲटलांटा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले. या अनुषंगाने काल रात्री महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत नमूद केल्यानुसार ॲटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया कंपनीला १९९६-९७ ते २००१-०२ या कालावधीत डांबरीकरणासह अन्य कामांचे तब्बल २५६ कार्यादेश प्रदान करण्यात आले होते. यातील कामांचा ॲडव्हान्स म्हणून तब्बल २४ कोटी ३८ हजार ४८० रूपये प्रदान करण्यात आले होते. यात कंपनीने १९ कोटी ५५ लाख ५८ हजार ८६ रूपये केलेल्या कामाचे म्हणून वसूल करण्यात आले होते. तर कंपनीकडे ४ कोटी ७९ लाख ४२ हजार ३९४ रूपये २००१-०२ पासून थकीत होते. यावर महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली असता सदर कंपनीने ११/०६/२००५ रोजीच्या पत्रातून आपल्याकडे थकबाकी असल्याचे मान्य केले होते.

या थकीत रकमेवर महापालिका अधिनियमानुसार दरमहा ९ टक्के चक्रवाढ व्याज आणि १९९७ पासून काम पूर्ण न केल्यामुळे पाचशे रूपये दररोजचा दंड अशी आकारणी एकूण तब्बल ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रूपये कंपनीकडून घेणे असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे कंपनीने जळगाव शहर महापालिकेची वर नमूद केलेल्या रकमेची फसवणूक केली आहे. यामुळे ॲटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक राझू अंबालाल बाबरोट आणि संचालकांच्या विरूध्द फसवणूक केल्याबद्दल शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा हा भादंवि कलम ४०६, ४०९ आणि ४२० अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक सागर शिंपी हे करीत आहेत. एकीकडे महापालिकेकडून तब्बल अकरा कोटी वसूल करणाऱ्या कंपनीच्या विरोधात तब्बल ४२ कोटींच्या वर रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound