Home Cities जळगाव सुप्रीम कॉलनी परिसरातील मांस विक्रीची दुकाने जप्त ; तर अवैध ढाबे जमीनदोस्त!

सुप्रीम कॉलनी परिसरातील मांस विक्रीची दुकाने जप्त ; तर अवैध ढाबे जमीनदोस्त!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहराला स्वच्छ आणि मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. गुरुवारी, ३० एप्रिल रोजी जळगाव महापालिकेच्या पथकाने सुप्रीम कॉलनी ते जळगाव टोल नाका या परिसरामध्ये धडक कारवाई करत, रस्त्यावरील अनधिकृत मांस विक्रीची दुकाने आणि विनापरवाना चालवले जाणारे ढाबे जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे शहरात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

१७ मांस विक्रीची दुकाने आणि ९ ढाब्यांवर कारवाई :
गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कॉलनी ते टोल नाका दरम्यानच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यावसायिक सक्रिय झाले होते. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला विनापरवाना मांस विक्री करणारे व्यावसायिक आणि अनधिकृतपणे उभारलेले लहान-मोठे ढाबे यांचा समावेश होता. महापालिकेच्या पथकाने गुरुवारी सकाळी अचानक धडक देत जेसीबीच्या साहाय्याने ९ ढाबे पूर्णपणे जमीनदोस्त केले. तसेच, रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या १७ मांस विक्रेत्यांवर कारवाई करत पथकाने १२ साहित्य भरलेल्या गाड्या जप्त केल्या आहेत.

महिनाभरापासून अतिक्रमण विरोधी मोहीम जोरात :
जळगाव महानगरपालिकेने गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गावरील समांतर रस्त्यांवरून अतिक्रमणे हटवण्यात आली. यामध्ये इच्छादेवी चौक, अजिंठा चौक, आकाशवाणी चौक ते खोटे नगर या भागाचा समावेश होता. त्यानंतर आपला मोर्चा जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्याकडे वळवत, बुधवारी अजिंठा चौक ते एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून आज ही मोठी कारवाई करण्यात आली.

पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा :
अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि विनापरवाना सुरू असलेली अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. आजची कारवाई ही केवळ सुरुवात आहे. यापुढे जर पुन्हा त्याच ठिकाणी बेकायदेशीर दुकाने लावण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधित व्यावसायिकांवर अधिक तीव्र आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.” या धडक कारवाईमुळे महामार्गावरील वाहतूक आता मोकळी झाली असून, नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. मात्र, अतिक्रमणधारकांमध्ये या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound