Home Cities जळगाव जळगाव रेल्वेस्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत !

जळगाव रेल्वेस्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत !

0
108


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या ते मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) आणि बनारस ते पुणे (हडपसर) या दोन महत्त्वपूर्ण ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचे आज जळगाव रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले, ज्यामुळे जळगावकर आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या सोहळ्यासाठी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवल्यानंतर दोन्ही एक्सप्रेस गाड्या आपल्या गंतव्य स्थानासाठी रवाना झाल्या.

रेल्वे स्थानकावर आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शाळेच्या बँड पथकाने शानदार धून वाजवत या गाड्यांचे जंगी स्वागत केले आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय, विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रभावी मल्लखांब प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. एकंदरीतच, रेल्वे स्थानकाचे परिसर आज एका उत्सवाच्या वातावरणात न्हाऊन निघाला होता.

अयोध्या येथील राम मंदिर निर्माणांनंतर भाविकांची अयोध्येकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेता, या दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील हजारो भाविकांना आणि प्रवाशांना अयोध्या, बनारस आणि पुणे-मुंबई प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक जलद आणि सुखद होणार आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound