Home क्राईम हळदीच्या कार्यक्रमात तरुणांवर प्राणघातक हल्ला, संशयित फरार !

हळदीच्या कार्यक्रमात तरुणांवर प्राणघातक हल्ला, संशयित फरार !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील टाकळी रोड परिसरातील खर्जे नाका येथे हळदीच्या कार्यक्रमात वाद सोडवण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन सख्या भावांसह महिलांनाही मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित भारत पवार वय २४ रा. नवेगाव टाकळी ता. चाळीसगाव हे आपल्या मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी २५ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गेले होते. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोपी तन्मय मोरे आणि रोहित चौधरी हे अन्य लोकांसोबत विनाकारण वाद घालत होते. फिर्यादी रोहित पवार आणि त्यांचे भाऊ महेश पवार यांनी आरोपींना “वाद घालू नका” अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लोखंडी रॉडने डोक्यावर, खांद्यावर आणि कमरेला मारहाण करून गंभीर जखमी केले.

इतकेच नाही तर, यावेळी मध्ये पडलेल्या फिर्यादींची आई मिराबाई पवार आणि बहीण योगिता बोरसे यांनाही आरोपींनी मारहाण केली. “जर पुन्हा मध्ये आलात, तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप धुळे करत आहेत.


Protected Content

Play sound