जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत अनियमित आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी दीर्घकाळ वीज गुल राहत असल्यामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. याबाबत महावितरण कंपनीने नागरीकांनी निवेदन दिले असून पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
या भीषण समस्येविरोधात परिसरातील सुमारे ४० नागरिकांनी यापूर्वी निमखेडी सबस्टेशनमध्ये लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मागील दोन दिवसांत तर परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून, २२ एप्रिल रोजी चक्क रात्री २ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. विशेष म्हणजे, या काळात सबस्टेशनवर अधिकारी अनुपस्थित होते आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनीही उचलले गेले नाहीत, असा आरोप ‘प्रभाग क्रमांक नऊ समस्या ग्रुप’ने केला आहे. हा कारभार ग्राहक सेवेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारा आहे.

आता संतप्त नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांचा आधार घेत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. नियमानुसार, वीज खंडित कालावधीसाठी ग्राहकांना भरपाई मिळणे बंधनकारक आहे, परंतु आजवर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
आपल्या निवेदनात नागरिकांनी वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासनाच्या नियमांनुसार प्रभावित ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर उच्च अधिकारी आणि ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



