Home Uncategorized फुले मार्केटमधील सुविधांचा बोजवारा; रमेश मतानींचे महापौरांना साकडे

फुले मार्केटमधील सुविधांचा बोजवारा; रमेश मतानींचे महापौरांना साकडे


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गजबजलेल्या सेंट्रल फुले मार्केट परिसरातील लाईट, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि पार्किंग-अतिक्रमणाच्या गंभीर समस्यांबाबत नगरसेवक रमेश मतानी यांनी महापौर दीपमाला काळे यांना २७,एप्रिल रोजी निवेदन सादर करत तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे. दररोज हजारो नागरिक, व्यापारी, महिला आणि ग्राहकांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रातील मूलभूत सुविधांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सादर निवेदनात सेंट्रल फुले मार्केट परिसरातील अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मार्केटमधील अनेक स्ट्रीट लाईट बंद असून आतील गल्ल्यांमध्ये रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने चोरी, छेडछाड आणि अनुचित प्रकारांची शक्यता वाढल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

यासोबतच पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पाणीपुरवठा अनियमित असून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. व्यापारी भाग असल्यामुळे स्वच्छतेसाठी आणि दैनंदिन वापरासाठी नियमित पाणीपुरवठा अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.

मार्केटमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था देखील निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिक्रमणामुळे स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसल्याचे तर जिथे सुविधा उपलब्ध आहेत, तिथे नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याची तक्रार करण्यात आली आहे. महिला ग्राहकांसाठी स्वतंत्र व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

परिसरातील कचरा व्यवस्थापन आणि साफसफाईचा अभाव हा आणखी एक गंभीर मुद्दा असल्याचे निवेदनात नमूद आहे. कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, डास-माश्यांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे. नियमित स्वच्छता मोहीम राबवून प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

पार्किंग आणि अतिक्रमणाच्या प्रश्नामुळे सेंट्रल फुले मार्केट परिसरातील वाहतूक विस्कळीत होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निर्धारित पार्किंग जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे ग्राहकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असून त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि गैरसोयी वाढत आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था आणि दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

नगरसेवक रमेश मतानी यांनी या सर्व समस्यांवर उपाय म्हणून बंद स्ट्रीट लाईट्स दुरुस्त करून नवीन लाईट्स बसवणे, नियमित पाणीपुरवठा सुरू करणे, सार्वजनिक स्वच्छतागृह अतिक्रमणमुक्त करून त्यांची देखभाल सुधारणे, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन बळकट करणे, पार्किंग क्षेत्र मोकळे करून नियोजनबद्ध व्यवस्था विकसित करणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर दीपक मंधान, जिनेंद्र शिनकर यांच्यासह गाळेधारकांची स्वाक्षरी आहे.


Protected Content

Play sound