Home Cities जळगाव जळगाव विधान परिषद जागेवर शिवसेनेचा दावा ; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

जळगाव विधान परिषद जागेवर शिवसेनेचा दावा ; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव विधान परिषद जागेवर शिवसेना शिंदे गट शंभर टक्के दावा करणार असल्याची स्पष्ट भूमिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडताच जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आधीच प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा फलकांवर ‘भावी आमदार’ असा उल्लेख झाल्याने राजकीय वातावरण तापले असताना गुलाबराव पाटील यांच्या विधानाने महायुतीतील जागावाटपावर नवा पेच निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.

जळगाव विधान परिषदेची जागा पूर्वी शिवसेनेकडे होती आणि त्या जागेवर दोन वेळा शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. मात्र मागील दोन कार्यकाळांपासून ही जागा भाजपकडे राहिली आहे. जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ जवळपास समान असल्याने या वेळी जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर ठाम भूमिका मांडणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील, मात्र आम्ही ही जागा मागणारच, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राज्यात विधान परिषदेच्या जागांची अदलाबदल करण्याचा अधिकार वरिष्ठ नेतृत्वाकडे असला तरी निवडणुकीत जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक गणित लक्षात घेऊन जळगावची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी आपण भाजप नेतृत्वासह एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत जागावाटपावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य बदलांच्या चर्चांदरम्यान जळगाव आणि नंदुरबारची जबाबदारी आपल्याकडे देण्यात आल्याबाबत विचारले असता, अशा चर्चा राजकारणात सुरूच असतात, त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राज्यातील सत्तासमीकरणांबाबतही नवी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित गुप्त भेटीबाबतही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. कोण कोणाला गुप्त भेटते की उघडपणे भेटते यावर चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला खुलासा ग्राह्य धरावा, असे सांगत त्यांनी या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

शिवाजी महाराजांबाबत बागेश्वर धाम महाराज यांच्या वक्तव्यावरही गुलाबराव पाटील यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत शिवराय आमचे दैवत असून त्यांच्याबाबत कोणीही अवमानकारक वक्तव्य करू नये, असा इशारा दिला. शिवाजी महाराजांचा अभ्यास केल्याशिवाय बोलू नये, असे सांगत त्यांनी बागेश्वर महाराजांना खडे बोल सुनावले. या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या भूमिकेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या विधानांबाबतही पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत पक्ष किंवा नेतृत्व अडचणीत येईल अशी वक्तव्ये टाळण्याची अपेक्षा व्यक्त केली. पक्षातील शिस्त आणि जबाबदारी जपण्याचा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला.


Protected Content

Play sound