जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून ओपनएआयने आपले सर्वात प्रगत आणि स्मार्ट मॉडेल म्हणून GPT-5.5 सादर केल्याचा दावा केला आहे. कंपनीने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करत या नव्या मॉडेलच्या लाँचची माहिती दिली असून, हे एआयच्या जगातील “पुढचे मोठे पाऊल” असल्याचे म्हटले जात आहे.
GPT-5.5 हे केवळ प्रश्नांची उत्तरे देणारे साधन न राहता आता वापरकर्त्यांचे संपूर्ण काम स्वतः नियोजित करून ते पूर्ण करण्याची क्षमता ठेवते, असा दावा करण्यात आला आहे. याआधीच्या एआय मॉडेल्सना प्रत्येक टप्प्यावर सूचना द्याव्या लागत होत्या, मात्र हे नवे मॉडेल गुंतागुंतीची आणि बहु-टप्प्यांची कामे सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्वतंत्रपणे हाताळू शकते, असे सांगितले जात आहे.

तज्ज्ञ डेव्हिड गेविर्ट्झ यांनी GPT-5.5 ची 10 विविध कामांमध्ये चाचणी घेतल्याचे सांगण्यात आले असून, त्यातून या मॉडेलची कार्यक्षमता, वेग आणि निर्णयक्षमता अधिक प्रगत असल्याचे दिसून आल्याचा दावा आहे. हे मॉडेल प्रकल्पांचे नियोजन, संशोधन, ऑटोमेशन आणि धोरणात्मक कामांमध्ये विशेष सक्षम असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
नव्या एआयच्या वैशिष्ट्यांनुसार, GPT-5.5 वापरकर्त्यांकडून केवळ आदेश घेत नाही तर संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन करून तो स्वतः अंमलात आणू शकतो. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्र, संशोधन आणि ऑफिस कामकाजात मोठा बदल घडू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, एआय क्षेत्रात GPT-5.5 सोबतच गुगलचे जेमिनी आणि क्लॉड यांसारख्या मॉडेल्सची स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्येक मॉडेल वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असून, भविष्यात एआय हे केवळ सहाय्यक साधन न राहता पूर्णतः काम करणारा डिजिटल सहकारी बनेल, अशी चर्चा सुरू आहे.



