मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. 9 नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसह एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणांना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.
महायुतीच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या एका जागेसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्याने पक्षात मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांकडून नेतृत्वापर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात असून शिष्टमंडळे, पत्रव्यवहार, जुनी आश्वासने आणि सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.

या शर्यतीत रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली आहे. त्याचबरोबर नाझेर काझी, सुनील मगरे, सुरेश बिराजदार, अमरसिंह पंडित, संजय दौंड, कल्याण आखाडे आणि सुरेखा ठाकरे यांसारख्या नेत्यांनी शिष्टमंडळांच्या माध्यमातून नेतृत्वाशी संपर्क साधत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही इच्छुकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वी दिलेल्या राजकीय आश्वासनांची आठवण करून देत दावा मजबूत करण्याचाही प्रयत्न केला आहे.
दरम्यान, या उमेदवारीच्या स्पर्धेत पैशांचाही मुद्दा चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षनिधीच्या नावाखाली काही इच्छुकांनी कोट्यवधी रुपयांची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे. एका माजी खासदाराच्या मुलानेही मोठी आर्थिक ऑफर दिल्याचे बोलले जात असून त्यामुळे उमेदवारी प्रक्रियेत आर्थिक समीकरणे प्रभाव टाकत असल्याचे आरोप पुढे येत आहेत.
याचवेळी सामाजिक प्रतिनिधित्वाचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आणि मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळाले, मात्र दलित समाजाला अद्याप संधी मिळाली नसल्याचा सवाल काही नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित नेते आणि कार्यकर्त्यांनी ‘एमएमडी फॅक्टर’ लागू करण्याची मागणी करत दलित प्रतिनिधीला संधी देण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे उमेदवारीची लढत केवळ राजकीय न राहता सामाजिक प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावरही केंद्रित झाल्याचे दिसत आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या गणितानुसार एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे असलेल्या संख्याबळाच्या जोरावर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीचे मिळून आठ उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला केवळ एक जागा मिळू शकते, असे समीकरण सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या एका जागेसाठी अखेर कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो आणि या रस्सीखेचीचा शेवट कुठे होतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.



