रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात वाढत्या उष्णतेचा पहिला बळी गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून उष्मघातामुळे एका कष्टकरी कामगाराचा मृत्यू झाला आहे. योगेश सुधाकर महाजन (रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, रावेर) असे मृत कामगाराचे नाव असून त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने पत्नी आणि दोन लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश महाजन हे बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रोजंदारीवर काम करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या योगेश महाजन यांचे जीवन कष्टमय असले तरी कुटुंबासाठी ते झटत होते. बांधकामावरील कामासोबतच फावल्या वेळेत ते दुधाच्या डेअरीमध्येही काम करत होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाचा फटका त्यांना बसला आणि उष्णतेच्या तीव्र झळांमुळे त्यांना उष्मघाताचा त्रास झाला.

प्रकृती बिघडल्यानंतर त्यांची तब्येत अचानक खालावली आणि रात्री सुमारे एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या घटनेने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. मेहनती, साधा आणि कुटुंबवत्सल स्वभावामुळे योगेश महाजन परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
मयत योगेश महाजन यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे. या घटनेमुळे उष्णतेच्या तीव्रतेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून, विशेषतः कष्टकरी आणि मैदानी काम करणाऱ्या मजुरांनी काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.



