Home Cities एरंडोल ‘जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही’ ; शिवसेना आमदारांचा पोलीस...

‘जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही’ ; शिवसेना आमदारांचा पोलीस ठाण्यात राडा


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल येथे मंगळवारी सायंकाळी एक हायव्होल्टेज राजकीय राडा पाहायला मिळाला. पारोळ्याचे शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एरंडोल पोलीस ठाण्यात तब्बल ५ तास ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर संबंधित अधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमका प्रकार असा की, अन्न व औषध विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी एरंडोल शहरातील काही लहान व्यावसायिकांवर गुटखा विक्रीच्या संशयावरून धाड टाकली होती. मात्र, कारवाईचे नियम धाब्यावर बसवून बाविस्कर यांनी संबंधितांकडून २० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप आहे. इतकेच नाही, तर खंडणी घेऊनही त्यांनी संबंधित व्यावसायिकांवर पोलीस कारवाई केली, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते.

ही बाब समजताच आमदार अमोल पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह एरंडोल पोलीस स्टेशन गाठले. बाविस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी त्यांनी पोलिसांकडे तगादा लावला. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यावर, “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेत पाटलांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि पोलीस ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली होती. अखेर, रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या हायव्होल्टेज नाट्यानंतर, दबाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अन्न व औषध अधिकारी किशोर बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने जळगावच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound