Home क्राईम किनगावजवळ क्रुझरच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

किनगावजवळ क्रुझरच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगावजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यावर विदगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तालुक्यातील किनगावहून यावलच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत असताना भरधाव वेगाने आलेल्या क्रुझर वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात ३८ वर्षीय पोलिस कर्मचारी भरत विठ्ठल कोळी गंभीर जखमी झाले होते. ते यावल पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

ही घटना ९ एप्रिल रोजी रात्री अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील हॉटेल मनमंदिरासमोर घडली. भरत कोळी हे दुचाकी क्रमांक एमएच १९ सीजी २८१३ ने विदगावहून किनगाव मार्गे यावलच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या क्रुझर वाहन क्रमांक एमएच २९ बीसी ५४८७ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. हे वाहन दीपक प्रकाश सपकाळे (रा. आडगाव, ता. यावल) यांच्या ताब्यात होते.

अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत भरत कोळी यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

भरत कोळी यांच्या निधनानंतर विदगाव (ता. जळगाव) येथे सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, डीवायएसपी नितीन गणापूरे, फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व शशिकांत पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलिस दलाच्या मानवंदना पथकाने हवेत रायफलच्या फेऱ्या झाडून त्यांना अंतिम सलामी दिली.

या अपघात प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या निधनामुळे सहकाऱ्यांमध्ये तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

 


Protected Content

Play sound