जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ICRAEST-2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन उत्साहात पार पडले असून देशभरातील संशोधकांच्या सहभागामुळे संशोधन व नवोन्मेषाच्या नव्या दिशा समोर आल्या. या परिषदेत एकूण 98 संशोधन पेपर सादर करण्यात आले.
Dr. Babasaheb Ambedkar Technological University, आयक्यूएसी आणि आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन 21 एप्रिल 2026 रोजी Dr. Ulhas Patil यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्त्या म्हणून Dr. Bedatri Maulik उपस्थित होत्या. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य Dr. Vijaykumar Patil, समन्वयक प्रा. महेश एच. पाटील, उपसमन्वयक डॉ. अतुल बऱ्हाटे, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, डॉ. हेमंत इंगळे तसेच प्राध्यापक व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी परिषदेमागील उद्दिष्टे स्पष्ट करत संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज अधोरेखित केली. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह देशभरातून संशोधक सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असून 5G, 6G, एज कॉम्प्युटिंग आणि जनरेटिव्ह एआय यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी एआयसीटीईच्या विविध पोर्टल्स आणि स्टार्टअप उपक्रमांद्वारे बूटकॅम्पमध्ये सहभाग घेतल्याने नवकल्पनांना चालना मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय परिषदांमधून संशोधनाची गुणवत्ता व प्रमाण दोन्ही वाढत असल्याचे सांगितले. विकसित भारताच्या उभारणीत संशोधकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित करत सर्व सहभागी संशोधकांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख वक्त्या डॉ. बेदात्री मौलिक यांनी “ड्रायव्हिंग पॅटर्न रिकग्निशन इन एनर्जी इफिशियंट ड्रायव्हिंग” या विषयावर बीज भाषण केले. त्यांनी पर्यावरणीय समस्या, प्रदूषणाचे दुष्परिणाम, पारंपरिक वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच रस्ते सुरक्षा विषयक धोके यावर सविस्तर मार्गदर्शन केले. इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात ऊर्जा कार्यक्षम ड्रायव्हिंगचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी आधुनिक ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम्स—जसे की अॅडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक ब्रेकिंग, इंटेलिजंट स्पीड कंट्रोल आणि लेन डिपार्चर वॉर्निंग—यांची माहिती दिली.
त्यांनी पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ड्रायव्हिंग स्टाईल विश्लेषण, ड्रायव्हर आयडेंटिफिकेशन, ऊर्जा व्यवस्थापन आणि बॅटरी मॅनेजमेंट यांचे महत्त्व स्पष्ट केले. टोयोटा प्रिअस या वाहनाचे उदाहरण देत पॉवर मॅनेजमेंट सिस्टीम कशा प्रकारे कार्य करते याचे सुलभ विश्लेषण त्यांनी मांडले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी विषय सोप्या भाषेत समजावून सांगितला.
परिषदेदरम्यान संगणक, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि बेसिक सायन्सेस या शाखांतील संशोधन ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आले. कॉम्प्युटर विभागात 49, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 22, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकलमध्ये प्रत्येकी 11 आणि बेसिक सायन्सेसमध्ये 5 संशोधन पेपर सादर करण्यात आले. निवडक संशोधन पेपर स्कोपस इंडेक्स जर्नलमध्ये प्रकाशित होणार असल्याची माहिती देण्यात आली.
संशोधन सादरीकरणासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांना सेशन चेअर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परिषद आयोजनासाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. महेश एच. पाटील आणि डॉ. अतुल बऱ्हाटे यांनी प्रभावी नियोजन केले. सल्लागार समितीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधकांचे मार्गदर्शन लाभले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल पाटील यांनी मानले.



