Home धर्म-समाज भेंडवड संकेत २०२६: पावसाचे असंतुलन; शेतीत मिश्र परिणाम, ज्वारी-बाजरीला उज्ज्वल संधी

भेंडवड संकेत २०२६: पावसाचे असंतुलन; शेतीत मिश्र परिणाम, ज्वारी-बाजरीला उज्ज्वल संधी


मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पार पडलेली भेंडवडची ऐतिहासिक घटमांडणी नुकतीच जाहीर झाली असून, यावर्षीच्या भाकिताने शेतकऱ्यांमध्ये कुतूहल आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. यंदाच्या भविष्यवाणीनुसार निसर्गाचा लहरीपणा शेतीवर मोठा परिणाम करणार असल्याचे स्पष्ट होत असून ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा मोठा इशारा देण्यात आला आहे.
पावसाच्या नियोजनाचा विचार करता यंदा जून महिन्यात वरुणराजाची कृपा कमी राहणार असल्याने सुरुवातीला चिंतेचे ढग
असतील. जुलै महिन्यात पावसाचा जोर काहीसा वाढेल, मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या काळात होणारी अतिवृष्टी शेतीसाठी नुकसानदायक ठरू शकते. पावसाचा हा प्रवास सप्टेंबरमध्ये चांगल्या अवकाळी पावसाने पूर्ण होईल, ज्याचा रब्बी हंगामाला फायदा होऊ शकतो.

पीक परिस्थितीवर नजर टाकल्यास यंदा तृणधान्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्वारी, बाजरी, तीळ आणि तांदूळ या पिकांची स्थिती अतिशय उत्तम राहणार असून या पिकांपासून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुख्य पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीनची स्थिती केवळ सर्वसाधारण राहण्याचे संकेत आहेत. कडधान्यांच्या बाबतीत यंदा काहीसे कठीण दिवस असतील; विशेषतः उडीद आणि भादली या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव जास्त राहील, तर जवस पिकाची मोठी नासाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तूर आणि वाटाणा यांसारखी पिके अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकलेली दिसतील, तर गहू आणि हरभऱ्याचे उत्पादन सरासरी राहील.

देशाच्या एकूण परिस्थितीवर भाष्य करताना भेंडवडच्या मांडणीत सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक, मात्र आर्थिक दृष्टीने नकारात्मक संकेत दिले आहेत. देशाचे नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते अधिक बळकट आणि सज्ज राहील, जे संकटकाळात महत्त्वाची भूमिका बजावेल. परकीय देशांकडून वाढणारा त्रास भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, तसेच देशाची आर्थिक स्थिती आव्हानात्मक राहणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष कृषी आणि आर्थिक क्षेत्रासाठी संघर्षाचे आणि नियोजनाचे वर्ष ठरणार असल्याचे चित्र या पारंपरिक मांडणीतून स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound