Home Cities जळगाव मुख्य अभियंत्यांचे निर्देश डावलून पी.ए. कायम : सुभाष राऊत यांची मनमानी !

मुख्य अभियंत्यांचे निर्देश डावलून पी.ए. कायम : सुभाष राऊत यांची मनमानी !


जळगाव-विशेष प्रतिनिधी । सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी थेट सीई म्हणजेच मुख्य अभियंत्यांनी दिलेले निर्देश डावलून प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणजेच पी.ए. चे पद आपल्या जवळच्या अभियंत्याकडे कायम राखल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या अनेक लीला उघड असून आजवर कुणी याबाबत बोलत नव्हते. तथापि, याला आता वाचा फुटल्याने विभागात चर्चेला एकच उधाण आले आहे. यात त्यांनी नियमबाह्य पध्दतीने केलेली पी.ए. नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वास्तविक पाहता १८/०६/२०२५ रोजी राऊत यांच्याकडील पी.ए. माळी यांना कार्यमुक्त करून त्यांना पारोळा येथे शाखा अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली. यामुळे नियमानुसार ते तेथे रूजू होणे गरजेचे असतांना माळी हे आपल्या पदावर कायम राहिले आहेत.

दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस न्यूजने हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नाशिक येथील मुख्य अभियंत्यांनी सुभाष राऊत यांना भ्रमणध्वनीवरून निर्देश देऊन पी.ए. पदावरून माळी यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. तथापि, त्यांनी हे आदेश धुडकावून लावत अद्याप देखील माळी यांना कार्यमुक्त केलेले नाही. याचाच अर्थ असा की, सुभाष राऊत हे स्वत:ला अधिक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्यापेक्षा मोठे समजतात. सार्वजनीक बांधकाम खात्यात हीच चर्चा सुरू आहे.

कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या अनेक सुरस बाबी आता समोर येत आहेत. आधी त्यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांनी कार्यभार सोडलेला नसतांना देखील सुभाष राऊत या पदावर रूजू झाल्याची आठवण सर्वांना आहेच. यातच आता थेट अधिक्षक अभियंता आणि मुख्य अभियंत्यांची दिशाभूल करून प्रोजेक्ट इंजिनिअरची नियुक्ती कायम ठेवून सुभाष राऊत यांनी आपली ‘दबंगगिरी’ दाखवून दिली असल्याची चर्चा आता सार्वजनीक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.


Protected Content

Play sound