जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून जिल्हापेठ पोलिसांनी तत्पर कारवाई करत रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटल परिसरात घडलेल्या या चोरीप्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी तपास लावत आरोपीकडून चोरीची रिक्षा आणि स्पेअर पार्ट्स जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात १२ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रिक्षा चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा व्यावसायिक रिक्षाचालक असून तो शहरातील विविध ठिकाणांहून रिक्षा चोरी करत असल्याचे समोर आले. चोरी केलेल्या रिक्षा कमी किमतीत विक्री करून तो आर्थिक लाभ घेत असल्याची माहितीही उघड झाली.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून अंदाजे ७५ हजार रुपये किंमतीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. तपासात MH19 BJ ०२५४ क्रमांकाची रिक्षा आणि तिचे स्पेअर पार्ट्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील रिक्षा चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलेश पवार करीत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे. या यशस्वी ऑपरेशनमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



