जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिद्द, चिकाटी आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांचा संगम घडला की यशाचे शिखर गाठणे अशक्य राहत नाही, याचे जिवंत उदाहरण जळगावमधील तरुण श्रीराज किशोरकुमार पाटील यांनी घालून दिले आहे. खडूवर साकारलेल्या त्यांच्या अद्वितीय शिल्पकलेची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, त्यांच्या नावाची ‘ओ.एम.जी. नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
खडू या नाजूक माध्यमावर अत्यंत सूक्ष्म आणि बारकाईने कोरीव काम करत श्रीराजने एक वेगळाच कलाविष्कार साकारला आहे. अत्यल्प जागेत आणि मर्यादित साधनांतून साकारलेली ही शिल्पकला पाहणाऱ्यांना थक्क करून सोडते. या यशामागे त्यांचे मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार, तसेच गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर सुनिल दाभाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. गुरु-शिष्यांच्या या जोडीने जळगावच्या कलाक्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली आहे.

सत्कार सोहळ्यादरम्यान श्रीराजने आपल्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वतः तयार केलेले खडू शिल्प भेट दिले. या शिल्पामध्ये दिसून आलेली बारकाई आणि सर्जनशीलता पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी यावेळी तरुणांनी अशा नाविन्यपूर्ण कलाप्रकारांतून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहनही केले.
या गौरव सोहळ्यावेळी श्रीराजचे कुटुंबीय उपस्थित होते. आई वनश्री पाटील, वडील किशोरकुमार पाटील, बहिण सौम्या पाटील आणि मार्गदर्शक सुनिल दाभाडे यांच्या उपस्थितीत हा क्षण अधिकच भावूक झाला. आपल्या मुलाचा सन्मान होताना पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. याशिवाय आजी आशालता मनोहर पाटील, आजोबा मनोहर मुरलीधर पाटील, आजी मिनाक्षी वासुदेव देशमुख आणि आजोबा वासुदेव हिमंतराव देशमुख यांनीही नातवावर कौतुकाचा वर्षाव केला.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या श्रीराजने आपल्या कलेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर गाठलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “कलेला वयाचे बंधन नसते,” असे मत व्यक्त करत चित्रकार सुनिल दाभाडे यांनी श्रीराजच्या यशाचे कौतुक केले असून, त्यांच्या या कामगिरीने जळगावच्या कलाक्षेत्राची मान उंचावली आहे.



