रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथे दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत असून दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 17 मे 2026 रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अव्यंग वधू-वरांना विवाहबंधनात अडकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रावेर तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात असल्याने या उपक्रमाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. इच्छुक दिव्यांग वधू-वरांनी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपली नावे नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीसाठी विविध पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून संजय दिनकर बुवा (रावेर), घनश्याम प्रभाकर हरणकर (विवरे), विशाल रत्नाकर कासार (सावदा), रजनीकांत शामराव बारी (रावेर), संदीप रामदास पाटील (केन्हाळा), प्रवीण पुंडलिक धनगर (आटवडा), कैलास पांडुरंग महाजन (कुसुंबा), दिलीप हिरालाल जैन (सावदा) तसेच सौ. ज्योती रजनीकांत बारी (रावेर) यांच्याकडे संपर्क साधता येणार आहे.

या विवाह सोहळ्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ओरिजनल आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड) यांचा समावेश आहे. इच्छुकांनी ही सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शासनाकडून दिले जाणारे आर्थिक सहाय्य. वधू-वर दोघेही दिव्यांग असल्यास त्यांना 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे, तर दोघांपैकी एक दिव्यांग असल्यास 1.5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी आर्थिकदृष्ट्याही मोठा आधार ठरणार आहे.
दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेने हा उपक्रम समाजातील दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी हाती घेतला आहे. या उपक्रमाला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, तसेच अधिकाधिक दिव्यांग वधू-वरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



