Home क्राईम दुचाकी मागितली, नकार मिळाला; मित्रानेच मित्रावर चालवला चाकू !

दुचाकी मागितली, नकार मिळाला; मित्रानेच मित्रावर चालवला चाकू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्षुल्लक कारणावरून वाद होण्याचे प्रमाण वाढत चालले असून, केवळ दुचाकी देण्यास नकार दिला म्हणून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत शामलाल कुकरेजा (वय ३२, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) हे १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगर परिसरातील पुलाखाली थांबलेले असताना ही घटना घडली. याच ठिकाणी संशयित आरोपी गजानन रमेश पाटील (वय २७, रा. शिवाजी नगर) याने भारत कुकरेजा यांच्याकडे त्यांची दुचाकी वापरण्यासाठी मागितली. मात्र, कुकरेजा यांनी दुचाकी देण्यास नकार दिला.

दुचाकी देण्यास नकार दिल्याने गजानन पाटील याला राग अनावर झाला. त्याने मनात खुन्नस धरून भारत कुकरेजा यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात डाव्या हाताच्या दंडावर आणि उजव्या हाताच्या काखेखाली चाकू लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर संशयित आरोपी गजानन पाटील याने शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी भारत कुकरेजा यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी गजानन रमेश पाटील रा. शिवाजी नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound